विद्युत खांब व मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत बॅनर तातडीने हटविण्याची जितेंद्र संदानशिव यांची मागणी, कारवाईसाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहरातील मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि विद्युत खांबांवर अंदाजे ४०० ते ५०० बॅनर, जाहिरात फलक व होर्डिंग्ज अनधिकृतपणे लावण्यात आले आहेत. हे बॅनर तातडीने हटवावेत, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जितेंद्र अनिल संदानशिव (रा. फरशी रोड, अमळनेर) यांनी अमळनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
काही बॅनर मुख्य रस्त्यांवरील विद्युत खांबांवर लावण्यात आले आहेत. या बॅनरमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्यामुळे बॅनर किंवा त्यांचे लोखंडी सांगाडे खाली कोसळल्यास वाहनचालक, पादचारी व नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक रस्ते व विद्युत खांबांचा असा अनधिकृत वापर सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे जितेंद्र संदानशिव यांनी नमूद केले आहे.
निवेदनात तीन कायद्यांतील तरतुदींनुसार तपास व कारवाईची मागणी करण्यात आली आहे:
- महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम, १९९५ (कलम ३ व ४): सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय जाहिरात किंवा बॅनर लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा.
- भारतीय न्याय संहिता, २०२३ (कलम २८५): सार्वजनिक मार्गात धोका किंवा अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी.
- भारतीय न्याय संहिता, २०२३ (कलम १२५): निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवितास किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण होत असल्यास कारवाई करावी.
निवेदनात सहा मागण्या करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व बॅनरची तातडीने पाहणी करून त्यांच्या परवानग्या तपासाव्यात. विनापरवाना बॅनर लावणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळे, जाहिरातदार तसेच जबाबदार व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ३ सह कलम ४ अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदवावा. वाहतुकीस अडथळा व जीवितास धोका निर्माण करणारे बॅनर हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाही करावी. बॅनर लावण्याचे आदेश देणारे, प्रत्यक्ष बॅनर लावणारे व त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. तसेच केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, असेही म्हटले आहे.
हे प्रकरण नागरिकांच्या जीवितासह सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित असल्याने त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने दखल घ्यावी, संभाव्य अपघात किंवा जीवितहानी होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तपासात दखलपात्र गुन्हा निष्पन्न झाल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १७३ अन्वये प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही विनंती जितेंद्र संदानशिव यांनी केली आहे.
![]()

