मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि आवश्यक कागदपत्रांची मिळणार माहिती, जळगांव जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी करणार मार्गदर्शन; पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून उपक्रमाचे आयोजन…
प्रतिनिधी | अमळनेर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अमळनेर शहर व तालुक्यातील तरुण-तरुणींसाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रताप महाविद्यालयातील कै. काकासाहेब शंकरराव राणे सभागृहात सकाळी ८.३० वाजता हे शिबिर होणार असून, यामध्ये उमेदवारांना अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांकडून भरती प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना योग्य दिशा मिळावी, भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांची माहिती व्हावी आणि त्यांची पूर्वतयारी अधिक सक्षम व्हावी, हा या प्रशिक्षण शिबिरामागील मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेची तयारी कशी करावी, शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, लेखी परीक्षेचे स्वरूप कसे असते आणि अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, त्यांची पूर्तता आणि इतर महत्त्वाच्या बाबींचीही माहिती उमेदवारांना देण्यात येणार आहे.
अमळनेर शहर व तालुक्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व इच्छुक तरुण-तरुणींनी गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता कै. काकासाहेब शंकरराव राणे सभागृह, प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे उपस्थित राहावे आणि या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
![]()

