स्वामिनी प्रकल्पांतर्गत १२ दिवसीय आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षणाचा समारोप; प्रशिक्षण सुरू असतानाच मिळाल्या दागिन्यांच्या ऑर्डर्स…
प्रतिनिधी | अमळनेर : आधार बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेले १२ दिवसीय आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले. दहा गावांतील २५ महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान महिलांना बेसिक ते अॅडव्हान्स स्तरापर्यंत आकर्षक दागिने तयार करण्याचे कौशल्य शिकविण्यात आले.
प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात सहभागी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालिका लीना प्रवीण पाटील होत्या. त्यांनी महिलांनी तयार केलेल्या दागिन्यांच्या विक्रीसाठी विविध कार्यक्रम, प्रदर्शने आणि मंगल ग्रह मंदिरातील उपक्रमांमध्ये स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापक सीमा पाटील यांनी ज्वेलरी मेकिंगमधील व्यावसायिक संधी व बाजारपेठेतील मागणी याबाबत मार्गदर्शन केले. ज्योती भावसार यांनी महिलांच्या कलाकुसरीचे कौतुक केले. आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील यांनी महिलांनी कौशल्याच्या बळावर स्वयंरोजगार सुरू करून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन केले.
संस्थेच्या कार्यकारी संचालिका रेणू प्रसाद यांनी महिलांच्या कलाकृतींचे कौतुक केले. प्रशिक्षिका नयना राजपूत यांनी व्यवसाय नियोजन, ग्राहकांच्या गरजा आणि व्यवसाय विस्ताराबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण सुरू असतानाच काही महिलांना दागिन्यांच्या ऑर्डर्स मिळू लागल्याने सहभागी महिलांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी दीपक संदानशिव, भावना सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामिनी प्रकल्प समन्वयक मुरलीधर बिरारी यांनी केले. उर्जिता शिसोदे, अमित देशमुख आणि ओम संदानशिव यांनी विशेष सहकार्य केले.
![]()

