मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत स्वच्छतेची मोहीम; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे विशेष लक्ष…
अमळनेर | प्रतिनिधी : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १८ मध्ये विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, संपूर्ण शहरात स्वच्छतेचा धडाका सुरू करण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार या मोहिमेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते, रस्त्यांचे दुभाजक, अंतर्गत रस्ते, नाले, गटारी, बाजारपेठा, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जात आहे. रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा, धूळ आणि अस्वच्छता दूर करण्यासोबतच नाले व गटारींमधील कचरा काढण्यावर भर दिला जात आहे.
विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ मुख्य रस्त्यांपुरती मर्यादित न ठेवता शहरातील सर्व १८ प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत वस्त्या आणि गल्लीबोळांमध्येही स्वच्छतेची कामे होणार आहेत.
दीपावलीपूर्वी प्रत्येक घराची स्वच्छता केली जाते. त्याच धर्तीवर संपूर्ण शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा संकल्प नगरपरिषदेने केला आहे. मात्र, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ नगरपरिषद प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे. नागरिकांनी रस्त्यावर, नाल्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. घरातील कचरा घंटागाडीतच द्यावा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दीपावलीच्या निमित्ताने सुरू झालेली ही विशेष स्वच्छता मोहीम शहराच्या स्वच्छतेला नवी दिशा देणारी ठरणार आहे. मात्र, या मोहिमेचा खरा परिणाम दिसण्यासाठी स्वच्छतेची कामे केवळ सणापुरती मर्यादित न राहता वर्षभर सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळाल्यास अमळनेर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी होऊ शकते.
![]()

