खरीप हंगाम २०२६ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी आमदार कृषिभूषण यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन…
प्रतिनिधी | अमळनेर : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० या कालावधीसाठी लागू केलेल्या सुधारित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) निकषांनुसार वाढीव आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने खरीप हंगाम २०२६ मध्ये राज्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या दरांमध्ये सन २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुधारणा केली आहे. या सुधारित निकषांनुसार शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वीच्या तुलनेत वाढीव दराने आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना जुन्या निकषांनुसार मदत न देता केंद्र शासनाने निश्चित केलेल्या नवीन व सुधारित NDRF दरांनुसार आर्थिक मदत मंजूर करावी, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शासनाने सुधारित निकषांची अंमलबजावणी केल्यास दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक आधार मिळू शकतो.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अमळनेर व एरंडोल उपविभागीय अधिकारी, अमळनेर तहसीलदार तसेच पारोळा तहसीलदार यांना माहितीस्तव व पुढील योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळण्यासाठी शासनाने सुधारित NDRF निकषांनुसार मदत मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
![]()

