वाळूचोरीविरोधात तक्रार करूनही कारवाई नाही; वाळूमाफियांच्या दहशतीचा मुद्दा विधान भवनात मांडणार, महसूलमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा..
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यात अवैध वाळूउपशामुळे वाळूमाफियांची दहशत वाढत असल्याचा आरोप करत, वाळूचोरीविरोधात आवाज उठविणाऱ्या शेतकऱ्याला ट्रकखाली चिरडून ठार मारण्यात आल्याच्या घटनेवर आमदार अनिलदादा पाटील यांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित शेतकऱ्याने घटनेच्या आठ ते दहा दिवस आधीच वाळूचोरीबाबत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. तसेच महसूल विभागाकडेही वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, वेळीच कारवाई न झाल्याने शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. या गंभीर प्रकरणाचा मुद्दा विधान भवनात उपस्थित करून महसूलमंत्र्यांना प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकारांशी संवाद साधताना आमदार पाटील यांनी या घटनेतील प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवले. संबंधित शेतकऱ्याने वाळूचोरी सुरू असल्याची माहिती पोलिसांना लेखी स्वरूपात दिली होती. महसूल विभागाकडेही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. तरीदेखील संबंधित यंत्रणांकडून ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. तक्रारींची वेळीच दखल घेतली असती, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आपण राज्याचे महसूलमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. एखाद्या अवैध धंद्याविरोधात सामान्य नागरिकाने आवाज उठवला, तर त्याला आपला जीव गमवावा लागणार का? तक्रारदाराच्या जीवाला धोका असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नसेल, तर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाळूमाफियांच्या वाढत्या दहशतीमुळे जिल्ह्यातील सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण बिघडण्याची भीतीही आमदार पाटील यांनी व्यक्त केली. अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाने समन्वयाने कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगत, या प्रकरणात संबंधित यंत्रणांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, शेतकऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अवैध वाळूउपसा आणि वाहतुकीविरोधात तक्रार करणाऱ्या नागरिकांना संरक्षण मिळावे, अशी भूमिका आमदार पाटील यांनी मांडली आहे. आता या प्रकरणावर विधान भवनात आवाज उठवल्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाकडून कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
![]()

