ई-मेलद्वारे धमकी मिळताच बीडीडीएस पथकाकडून न्यायालय परिसराची कसून तपासणी; शोधमोहिमेत संशयास्पद वस्तू आढळली नाही…
प्रतिनिधी | जळगाव : जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्याने सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने सुरक्षा यंत्रणा सतर्क करीत न्यायालयाच्या इमारतीसह संपूर्ण परिसराची तपासणी केली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) राबविलेल्या तपासणी मोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक साहित्य आढळून आले नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बीडीडीएस पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानुसार शोधक आणि नाशक पथकाने न्यायालयाची इमारत, परिसरातील विविध ठिकाणे तसेच संभाव्य धोक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागांची बारकाईने तपासणी केली. या तपासणीत स्फोटक साहित्य अथवा घातपाताशी संबंधित कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा न्यायालयात दररोज न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. त्यामुळे अशा प्रकारच्या धमकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. संभाव्य धोका टाळण्यासाठी न्यायालय परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली.
दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठविला, त्यामागील उद्देश काय होता आणि या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेणे आता तपास यंत्रणांसमोर महत्त्वाचे आव्हान आहे. ई-मेलचा स्रोत शोधणे आणि त्याची सत्यता पडताळणे या दृष्टीने पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, ई-मेल पाठविणाऱ्याची ओळख किंवा तपासातील संशयितांबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
![]()

