शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थी विकासातील योगदानाची शासनाकडून दखल; राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा…
प्रतिनिधी | पारोळा : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘आयडॉल शिक्षक शोध व निवड प्रक्रिया’ अंतर्गत राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय, पारोळा येथील महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त डॉ. ईश्वर एस. पाटील यांची महाराष्ट्र राज्यस्तरावर ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी विकासासाठीच्या उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आल्याने सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ (टेहू), पारोळा संचलित राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या अध्यापनातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा या निवड प्रक्रियेत विचार करण्यात आला.
राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ निवडीसाठी शिक्षकांच्या कार्याचे विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये संबंधित विषयाचे ज्ञान, अध्यापन कौशल्य, शिक्षकाचे शारीरिक व मानसिक आरोग्य, विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त केलेले अवांतर वाचन, शिक्षकांची शाळेतील दैनंदिन उपस्थिती, शालेय स्वच्छता आणि परिसरातील वृक्षसंवर्धन या बाबींचा समावेश होता.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीतील प्रगती, शैक्षणिक व सामाजिक जनजागृतीसाठी केलेले प्रयत्न, शिक्षकांनी पूर्ण केलेली विविध प्रशिक्षणे, अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी दिलेले योगदान या निकषांचाही विचार करण्यात आला. आतापर्यंत सुमारे अडीच लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमासह राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध शासकीय योजना आणि कार्यक्रमांची माहिती विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही या निवड प्रक्रियेत समावेश होता.
या सर्व निकषांवर आधारित निवड प्रक्रियेत डॉ. ईश्वर एस. पाटील यांनी राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ हा बहुमान प्राप्त केला आहे. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला असून, आता राज्यस्तरीय निवडीमुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याला आणखी एक महत्त्वपूर्ण सन्मान प्राप्त झाला आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. वंदना एस. पाटील, प्रा. पी. पी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव मोरे, संचालक तथा उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे, संचालक पराग मोरे, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. ईश्वर पाटील यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची तळमळ, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाला मिळालेली ही राज्यस्तरीय पावती मानली जात असून, त्यांच्या निवडीमुळे सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ आणि राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
![]()

