साक्ष देण्याच्या वादातून चौघांनी कट रचून खून केल्याचा आरोप; चालकाला अटक, तीन आरोपी फरार…
प्रतिनिधी | अमळनेर : विरोधात साक्ष देतो, या कारणावरून झालेल्या वादातून चौघांनी संगनमत करून शरद रतन पाटील यांना वाळूच्या डंपरखाली ढकलून चिरडल्याची धक्कादायक घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांद्री येथील बसस्थानकासमोर घडली. या घटनेत शरद रतन पाटील यांचा उपचारासाठी धुळे येथे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०३(१), १०९, ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरचालक भरत सुभाष पाटील याला अटक करण्यात आली आहे. अन्य तीन आरोपी फरार आहेत.
याबाबत नगाव बुद्रुक येथील ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर गोसावी हे आपल्या अंगणात मोटारसायकल लावत असताना विपुल किरण गोसावी, सागर संजय गोसावी आणि मयूर अनिल बोरसे हे वाळूचे ट्रॅक्टर मागे घेत असताना त्यांना धक्का लागला. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता तिघांसह संजयगिर गोसावी यांनी ज्ञानेश्वर व त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दुसऱ्या दिवशी तलाठी महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यावेळी शरद रतन पाटील हे साक्षीदार होते. याचा राग मनात धरून विपुल गोसावी याने शरद पाटील यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. ‘तू आमच्याविरुद्ध साक्ष देतो का? रस्त्यावर सापडला तर तिथेच चिरडून टाकू. तू जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांकडे जा, माझे कोणीही काही करू शकत नाही,’ अशा शब्दांत धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावेळी गावातील लोकांनी समजूत घातल्याने शरद पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती.
दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास पोलीसपाटील प्रवीण गोसावी यांचा वाढदिवस असल्याने शरद रतन पाटील यांच्यासह काही जण सावखेडा येथील देव हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. नांद्री बसस्थानकाजवळ ते थांबले असताना पातोंडा गावाकडून राखाडी रंगाची मारुती कार वेगाने आली. या कारने महेश आत्माराम पाटील यांना कट मारून पुढे जाऊन थांबली. कारमधून विपुल गोसावी, मयूर बोरसे आणि सागर गोसावी खाली उतरले. त्याचवेळी पातोंडाकडून डंपर क्रमांक एचआर ३७ डी ८९५७ तेथे आला. डंपरचालक भरत सुभाष पाटील याने खाली उतरून उपस्थितांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी प्रवीण गोसावी यांनी तुम्ही माणसे मारायला निघाले आहात का, अशी विचारणा केली. त्यावर विपुल गोसावी याने डंपरचालक भरत याला शरद पाटील यांना उडवून देण्यास सांगितल्याचा आरोप आहे. मयूर बोरसे आणि सागर गोसावी यांनीही त्याला चिरडून टाकण्यास सांगितले. त्यानंतर चालकाने डंपर वेगाने पुढे नेला. विपुल गोसावी व मयूर बोरसे यांनी शरद पाटील यांना डंपरसमोर ढकलले, तर सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
डंपर शरद पाटील यांच्या अंगावरून गेल्याने त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन ते चिरडले गेले. घटनेनंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी शरद पाटील यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात येत होते. त्याचदरम्यान रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आमदार अनिल पाटील यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि उपचारासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भंगाळे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांनीही घटनास्थळी व रुग्णालयात भेट दिली. आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. दहिवद फाटा-पिंपळी मार्गे पसार झालेला डंपर बुधगाव येथे पकडण्यात आला. डंपरचालक भरत सुभाष पाटील याला रात्रीच अटक करण्यात आली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर गोसावी यांच्या फिर्यादीवरून विपुल किरण गोसावी, सागर संजय गोसावी, मयूर अनिल बोरसे आणि डंपरचालक भरत सुभाष पाटील या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला अटक झाली असून उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय गणेश अहिरे करीत आहेत.
![]()

