छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून आंदोलन केल्याने नाराजीचा आरोप; माजी आमदार शिरीष चौधरी यांनी फेटाळले आरोप…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत पदाधिकाऱ्यांमधील मतभेद समोर आले असून शहरप्रमुख भरत प्रकाश पवार आणि युवासेनेचे तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर यांनी आपल्या पदांचे राजीनामे वरिष्ठांकडे सादर केले आहेत. धुळे रस्त्यावरील प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर माजी आमदार शिरीष चौधरी नाराज झाल्याचा आरोप या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे. मात्र, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी हा आरोप फेटाळत पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
शहरप्रमुख भरत प्रकाश पवार आणि युवासेनेचे तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर यांनी जिल्हाप्रमुखांसह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे आपले राजीनामे सादर केले आहेत. राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केल्यानुसार, धुळे रस्त्यावरील प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी काही नागरिकांनी निवेदन दिले होते. त्यानंतर नगरपालिकेवर मोर्चाही काढण्यात आला होता. नगरपालिकेसमोर झालेल्या या आंदोलनात दोन्ही पदाधिकारी सहभागी झाले होते.
या आंदोलनामागे कोणतेही राजकारण नव्हते, तर शिवसेनेचा विचार पुढे नेण्याच्या उद्देशाने आपण सहभागी झालो होतो, असे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे. मात्र, या आंदोलनामुळे माजी आमदार शिरीष चौधरी नाराज झाले आणि त्यांनी राजीनामा देण्यास सांगितल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पदांचा राजीनामा दिला असला तरी शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम सुरूच ठेवणार असल्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला आदर असून आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह उभारले आहे. तसेच तेथे महाराजांचा मोठा पुतळाही उभारला आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराच्या नामकरणाच्या मागणीवरून नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले. पक्षाचे राजकारण आणि नगरपालिकेचे धोरण या दोन स्वतंत्र बाबी आहेत. नगरपालिकेने सभेत ठराव करून प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यास होकारही दिला आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीबाबत बोललो होतो. त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी राजीनामे दिले असावेत, असे स्पष्टीकरण शिरीष चौधरी यांनी दिले.
या राजीनाम्यांमुळे अमळनेरमधील शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत पदाधिकाऱ्यांमधील मतभेद सार्वजनिक झाले असून, या प्रकरणावर पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी काय भूमिका घेतात आणि दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले जातात की त्यांची समजूत काढली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
![]()

