पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे निमंत्रण स्वीकारले…
प्रतिनिधी | अमळनेर : केंद्रीय जलशक्तीमंत्री ना. सी. आर. पाटील लवकरच अमळनेर येथे येऊन पाडळसरे धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरत येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निमंत्रण दिले असता, त्यांनी ते स्वीकारले आणि लवकरच भेट देण्याचे आश्वासन दिले.
सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीत तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या कामाला अधिकाधिक गती द्यावी, या मागणीसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांची भेट घेतली. समितीचे प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, पदाधिकारी एन. के. पाटील, नगरसेवक राजूभाऊ फाफोरेकर, शेतकरी संघाचे चेअरमन संभाजी पाटील आणि स्थानिक कार्यकर्ते छोटूभाई पटेल आदी या वेळी उपस्थित होते.
या भेटीत पदाधिकाऱ्यांनी धरणाच्या कामाची सद्यस्थिती मंत्र्यांसमोर मांडली. पाडळसरे धरणाचे काम पूर्ण झाल्यास खानदेशातील जळगाव व धुळे जिल्ह्यांतील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कामाला गती देण्यासाठी मंत्र्यांनी अमळनेर येथे यावे, असे निमंत्रण देण्यात आले. पाडळसरे धरणाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट केल्याबद्दल समितीने केंद्र सरकारचे आभारही मानले.
निमंत्रणाचा स्वीकार करताना ना. पाटील यांनी सांगितले की, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ व आमदार अनिलदादा पाटील यांच्याकडूनही अमळनेर येथे भेट देण्यासंदर्भात आग्रह आहे. त्यामुळे लवकरच येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खानदेशच्या व लिंबायत (सुरत) विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. संगीताताई पाटील, केंद्रीय मंत्री यांचे कार्यकर्ते छोटूभाई पटेल, जिग्नेशभाई पटेल यांचीही समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा झाली.
![]()

