अमळनेर-धुळे मार्गावर भीषण अपघात; मृत चोपडा तालुक्यातील रहिवासी; पोलिसांकडून तपास सुरू…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर-धुळे मार्गावरील मंगरूळ गावाच्या शिवारात रिक्षा आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोरच्या धडकेत ४२ वर्षीय विलास यशवंत पाटील (रा. बुद्धगाव-अनवदे, ता. चोपडा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकल (क्रमांक एमएच १८ ईएस ०१५९) धुळ्याकडे जात असताना मंगरूळ शिवारात समोरून येणाऱ्या रिक्षाशी तिची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की विलास पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील डॉक्टर सूर्यवंशी आणि सोंदाने यांनी तातडीने जखमींना वैद्यकीय मदत दिली. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, तर जखमीवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. अपघातानंतर काही काळ अमळनेर-धुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, ती नंतर सुरळीत करण्यात आली.
या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
![]()

