पाच वर्षांपासून रखडलेल्या १४३ पाणीपुरवठा योजनांवर नाराजी; जून २०२७ पर्यंत पाणी नियोजनाचे निर्देश, गैरहजर अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा…
प्रतिनिधी | अमळनेर : दुष्काळ निवारणाच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. केवळ कागदोपत्री अहवाल सादर करण्याऐवजी प्रत्यक्ष काम करून दाखवा, अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोकरीच खाणार, असा कडक इशारा आमदार अनिलदादा पाटील यांनी दिला. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा भवन येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
अमळनेर तालुक्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा, चारा, आरोग्य, शेती आणि जनावरांच्या संरक्षणासह विविध विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील १४३ पाणीपुरवठा योजना असूनही गेल्या पाच वर्षांत संबंधित कामे पूर्ण न झाल्याबद्दल आमदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तांत्रिक अडचणींचे कारण पुढे न करता तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, तसेच नाला खोलीकरणाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
नाला खोलीकरणाच्या कामांसाठी रॉयल्टीच्या बाबतीत आवश्यक ती लवचिकता ठेवावी. धरणाच्या ठेकेदाराला मुरूम आवश्यक असल्यास त्याच्याकडून नाला खोलीकरणाचे काम करून घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. वृक्षांना आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच गुरेढोरे चोरी आणि विजेच्या तारा चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारांवर कायद्याचा बडगा उगारावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने पाण्याच्या शुद्धतेची नियमित तपासणी करावी. नागरिकांना उपलब्ध होणारे पाणी पिण्यास सुरक्षित राहील, याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक विभागाने संभाव्य अडचणींचा विचार करून पर्यायी नियोजन अर्थात ‘बी प्लॅन’ तयार ठेवावा, असे निर्देश आमदार पाटील यांनी दिले.
यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी जून २०२७ पर्यंतचे पाणी नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तहसीलदार डॉ. उमाताई ढेकळे यांनी दुष्काळी पंचनाम्यांचा अहवाल सादर केला, तर गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी जलतारा प्रकल्प, चारा लागवड आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
अमळनेर शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तीन आवर्तने राखीव ठेवण्यात आल्याचे सांगितले. सध्याचा उपलब्ध पाणीसाठा ५ डिसेंबर २०२६ पर्यंत पुरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी कौस्तुभ पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुवर, मनरेगाचे किशोर ठाकरे, तालुका कृषी अधिकारी सी. जे. ठाकरे, भूमी अभिलेख उपअधीक्षक स्मिताताई गावित, निम्न तापी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी यशोदीप कडलग, सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, साजिद मन्सुरी यांच्यासह आरोग्य, महिला व बालविकास, पशुवैद्यकीय आणि बीज वितरण विभागाच्या प्रतिनिधींनी आपापल्या विभागांचा आढावा सादर केला.
बैठकीस ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी विकास अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य गिरीश पाटील, सरपंच सुरेखाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पत्रकार दादासाहेब संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर शेवटी आभार मानले.
![]()

