विभागीय क्रीडा स्पर्धेत ४ × ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण, तर ४ × १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदकाची कमाई; पाच खेळाडूंची बोईसर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…
प्रतिनिधी | अमळनेर : पिंपळे बु. येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेच्या खेळाडूंनी विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली आहे. ४ × ४०० मीटर रिले प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक, तर ४ × १०० मीटर रिले प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदक मिळविले. या यशाच्या जोरावर शाळेच्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात १७ वर्षांखालील मुलांच्या विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यशवंत आश्रमशाळेच्या खेळाडूंनी वेग, समन्वय, संघभावना आणि जिद्दीच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शाळेच्या क्रीडा यशात भर घातली.
या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या खेळाडूंमध्ये प्यारसिंग टिंका पावरा, राजकिरण अमाश्या पावरा, सवित सिताराम पावरा, रोहन खुशाल पावरा आणि पवन सायसिंग पावरा यांचा समावेश आहे. या पाचही खेळाडूंची आगामी दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी बोईसर, ता. जि. पालघर येथे आयोजित राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळाडूंना उच्च माध्यमिक विभागाचे विज्ञान शिक्षक तथा क्रीडा प्रशिक्षक स्वप्निल एच. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संघ व्यवस्थापक म्हणून सतीश कागणे यांनी जबाबदारी सांभाळत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा माईसो विद्याताई पाटील, संस्थेचे सचिव व शैक्षणिक मार्गदर्शक युवराज पाटील, संचालक ॲड. अभिजीतदादा पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, अमळनेर तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक उदय पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्येही उत्तम क्रीडा कौशल्य आणि गुणवत्ता असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे. विभागीय स्तरावर पदकांची कमाई केल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेतही यश मिळविण्याच्या दृष्टीने हे खेळाडू सज्ज झाले आहेत.
![]()

