अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पसार; ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील नाद्री गावाजवळ वाळूने भरलेल्या भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचे दोन्ही पाय डंपरखाली चिरडले गेले. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर डंपरचालक वाळू खाली करून घटनास्थळावरून पसार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघात झाल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. डंपरखाली अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत चालकाने वाळू खाली करून तेथून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पाटोंदा येथील १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमीला प्राथमिक उपचारांसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वाळूची अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगाबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांवरून अशी अवजड वाहने भरधाव जात असल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपासानंतरच वस्तुस्थिती समोर येणार असून फरार चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.
![]()

