चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंडे यांचे आवाहन; परीक्षार्थी, विद्यार्थी व सामाजिक संस्थांना १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत शपथपत्रासह पुरावे सादर करण्याची मुदत…
विशेष बातमी | मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र चौकशी आयोगाने नागरिकांकडून निवेदने व पुरावे मागवले आहेत. या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेल्या परीक्षार्थी, विद्यार्थी, नागरिक तसेच सामाजिक संस्थांनी आपले म्हणणे शपथपत्रासह १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आयोगाकडे सादर करावे, असे जाहीर आवाहन आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंडे यांनी केले आहे.
राज्य शासनाने या प्रकरणांच्या चौकशीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे. आयोगाने २९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून, चौकशीच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित घटनांमागील वस्तुस्थिती आणि परिस्थिती तपासणे, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणे, ही आयोगाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
या चौकशीच्या कक्षेत औषध निरीक्षक परीक्षा गट-ब २०२५, महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४, अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा २०२३, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ अशा नऊ परीक्षांचा समावेश आहे.
दरम्यान, या परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांबाबत प्रत्यक्ष माहिती असलेल्या किंवा त्याचा फटका बसलेल्या व्यक्तींनी आपले म्हणणे पुराव्यांसह मांडावे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवेदन मराठी किंवा इंग्रजी भाषेत हस्तलिखित अथवा टंकलिखित स्वरूपात सादर करता येणार असून, त्यासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. निवेदन शपथपत्राच्या स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे.
निवेदने १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आयोगाच्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील अन्न व औषध प्रशासन भवन, दालन क्रमांक २०१, दुसरा मजला येथे पोहोचणे आवश्यक आहे. तसेच निवेदनाची व संबंधित कागदपत्रांची प्रत आयोगाच्या अधिकृत ई-मेलवरही पाठवता येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती किंवा मदतीसाठी आयोगाने ०२२-२०८६७६७७ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
आयोगाकडे प्राप्त होणारी प्रतिज्ञापत्रे आणि कागदपत्रे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. प्राप्त निवेदनांची छाननी केल्यानंतर संबंधित व्यक्तींना साक्षीदार म्हणून आयोगासमोर बोलवायचे किंवा नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाकडे राहणार आहे. त्यामुळे MPSC परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांबाबत माहिती, तक्रारी किंवा ठोस पुरावे असलेल्या व्यक्तींनी निर्धारित मुदतीत आयोगाकडे आपले म्हणणे नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

