पाच तरुणींसह एका महिलेचा आणि तिच्या तीन लहान मुलांचा समावेश; पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल…
प्रतिनिधी | अमळनेर :तालुक्यात गेल्या तीन दिवसांत अपहरणाच्या चार घटना घडल्या असून, यात पाच तरुणी, एक विवाहित महिला आणि तिची तीन लहान मुले अशा एकूण आठ जणांना पळवून नेण्यात आले आहे. पातोंडा, अमळनेर शहर आणि कळमसरे येथे १९ ते २१ तारखेदरम्यान घडलेल्या या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस तपास करीत आहेत.
पातोंडा येथील २३ वर्षीय तरुणी १९ रोजी सकाळी साडेदहा वाजता दुकानातून सामान आणते असे सांगून घराबाहेर पडली, मात्र ती परत आली नाही. याच दिवशी तिच्या शेजारी राहणारी २२ वर्षीय मावशीही आई आणि भाऊ घरी नसताना घरातून बेपत्ता झाली. सायंकाळी घरी परतल्यानंतर मुलीच्या मामाला भाची आणि बहीण दिसली नाही. त्यांनी शोध घेतला असता, गावातील दोघा तरुणांनी त्यांना पळवून नेल्याची माहिती मिळाली. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.
शहरातील जिनगर गल्लीतून २० रोजी सकाळी नऊ वाजता २४ वर्षीय विवाहित महिला, तिची चार वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांची दोन मुले अशा चौघांना कुणीतरी पळवून नेले. पतीने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल अरुण राठोड करीत आहेत.
शहरातील पाठक गल्लीतील १९ वर्षीय तरुणी विप्रो कंपनीत कामाला होती. २१ रोजी दुपारी तीनच्या सुमारास एकाने तिला कंपनीजवळून पळवून नेले. मुलगी घरी न आल्याने तिच्या वडिलांनी अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.
तालुक्यातील कळमसरे येथील २८ वर्षीय तरुणीला २१ रोजी पहाटे पाच वाजता तिच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद साळी करीत आहेत.
![]()

