आमदार अनिल पाटील यांना १२ मागण्यांचे निवेदन; अधिवेशनात प्रश्न मांडण्याचे साकडे…
प्रतिनिधी | अमळनेर : दिव्यांगांना मिळणारे मासिक मानधन २ हजार ५०० रुपयांवरून थेट ६ हजार रुपये करण्यात यावे, अशी जोरदार मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेने केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिलदादा पाटील यांची भेट घेऊन १२ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले. आगामी विधानसभा अधिवेशनात हे प्रश्न ठामपणे मांडावेत, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.
वाढत्या महागाईमुळे सध्याचे मानधन अपुरे पडत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. औषधोपचार, अन्नधान्य, प्रवास आणि इतर जीवनावश्यक खर्च भागवणे दिव्यांगांना कठीण झाले आहे. रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेकांना आर्थिक विवंचनेत दिवस काढावे लागत असून, त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी संघटनेची भूमिका आहे.
मानधनवाढीसोबतच बेरोजगार दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणे, शासकीय सेवांतील रिक्त राखीव पदे तातडीने भरणे, स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी किंवा सवलतीच्या व्याजदराने कर्ज देणे आणि घरकुल योजनांत प्राधान्य देणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य, लॅपटॉप आणि उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याचीही मागणी आहे.
शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार व औषधोपचार, तसेच कृत्रिम अवयव, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल आणि श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्यावर संघटनेने भर दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधीचा योग्य व पारदर्शक वापर करावा, एसटी आणि रेल्वे प्रवास सवलतींचा लाभ सुलभ करावा, तसेच दिव्यांग महिलांसाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशीही मागणी आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करावी, तालुकास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणि अंत्योदय योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा आणि शासकीय समित्यांमध्ये दिव्यांग संघटनांना प्रतिनिधित्व द्यावे, अशा मागण्याही निवेदनात आहेत. आमदार पाटील यांनी मासिक मानधन ६ हजार रुपये करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा आणि इतर मागण्यांसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करावा, अशी संघटनेची अपेक्षा आहे.
‘दिव्यांगांना दया नको, हक्क हवा; आश्वासन नको, प्रत्यक्ष न्याय हवा!’ या घोषणेतून संघटनेने मागण्यांची तीव्रता व्यक्त केली. यावेळी करीम बागवान, फारुक शेख, बिरजू पेपरसी, नूरखान, अमोल मराठे, कलीम शेख, मंजू ताई, आबा दशमुख, सविता ताई, सलमा बागवान आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
![]()

