यंदा पहिल्यांदाच ५० दिवसांचा दुसरा टप्पा; २०११ च्या तुलनेत ११ प्रश्नांची वाढ; जातीनिहाय माहितीसह, नागरिकत्व, आधार आणि बँक खात्यांसह एकूण ४० प्रश्नांची माहिती संकलित होणार…
विशेष बातमी | नवी दिल्ली : देशात होणाऱ्या जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली असून, यावेळी जनगणनेची प्रक्रिया अधिक विस्तारित असणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी जवळपास ५० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन पद्धतीने माहिती नोंदविण्यासाठी १५ दिवसांची स्वतंत्र संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जनगणनेत नागरिकांना जातीशी संबंधित माहितीसह एकूण ४० प्रश्न विचारले जाणार असून, २०११ च्या जनगणनेतील २९ प्रश्नांच्या तुलनेत यंदा ११ नवीन प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
जनगणना आयुक्त मृत्यूंजर कुमार नारायण यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, दुसऱ्या टप्प्यातील जनगणना प्रक्रिया १० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. यापूर्वीच्या जनगणनांमध्ये ही प्रक्रिया साधारणतः ९ ते २८ फेब्रुवारी या २० दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली जात होती. मात्र, यंदा स्वगणनेसाठी स्वतंत्र कालावधी देण्यात आल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
या प्रक्रियेत नागरिकांना १० जानेवारी ते २४ जानेवारी २०२७ या १५ दिवसांच्या कालावधीत स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येणार आहे. त्यानंतर जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करणार आहेत. जनगणनेसाठी १ मार्च २०२७ ही संदर्भ तारीख निश्चित करण्यात आली असून, १ ते ५ मार्चदरम्यान नोंदविलेल्या माहितीतील त्रुटी दुरुस्त करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.
यंदाच्या जनगणनेत नागरिकांकडून संकलित केल्या जाणाऱ्या माहितीचे स्वरूपही विस्तारित करण्यात आले आहे. यामध्ये जातीनिहाय माहिती, पती-पत्नीचे नाव, आई-वडिलांची माहिती, नागरिकत्व, कायमस्वरूपी पत्ता आदी बाबींचा समावेश असेल. याशिवाय कोविड लसीकरणाचे ठिकाण, कुटुंबातील एकूण बँक खाती, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहनचालक परवाना यांसंबंधीची माहितीही विचारली जाणार असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.
दरम्यान, मणिपूर, गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या ठिकाणांचा अपवाद वगळता इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान जनगणना होणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या १२१ कोटी होती. त्यामध्ये ६२.३२ कोटी पुरुष आणि ५८.७५ कोटी महिलांचा समावेश होता. त्यावेळी देशातील कुटुंबांची संख्या जवळपास २५ कोटी इतकी होती. आता २०२७ च्या जनगणनेत नव्या प्रश्नांचा समावेश आणि जातीनिहाय माहिती संकलनामुळे देशातील लोकसंख्येचे सामाजिक व लोकसंख्याशास्त्रीय चित्र अधिक तपशीलवार स्वरूपात समोर येण्याची अपेक्षा आहे.
![]()

