रात्रभर दुचाकीसह नाल्यात पडून; पहाटे नागरिकांच्या मदतीने सुटका, धुळ्यात उपचार सुरू…
प्रतिनिधी | अमळनेर : भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राहुल मगन चौधरी (वय २६) हे दुचाकीसह पिंपळे नाल्यात कोसळून गंभीर जखमी झाले. मंगळवारी (२७ ऑक्टोबर) रात्री झालेल्या या अपघातानंतर ते रात्रभर नाल्यात पडून होते. बुधवारी (२८ ऑक्टोबर) पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास घटना आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यांना पुढील उपचारांसाठी धुळ्यातील सेवा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
अपघातात राहुल यांच्या डोक्याला, छातीला, पोटाला तसेच हात-पायांनाही गंभीर दुखापत झाली. चेहरा सुजल्याने सुरुवातीला त्यांची ओळख पटविणेही कठीण झाले होते. राहुल रात्री न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला आणि मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास नागरिकांना राहुल नाल्यात पडल्याचे दिसले. त्यांनी नगरसेवक सचिन पाटील यांना माहिती दिली. सचिन पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने राहुल यांना बाहेर काढले. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला; मात्र ती वेळेत न पोहोचल्याने पत्रकार संजय पाटील यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर तुळजाई हॉस्पिटलच्या खासगी रुग्णवाहिकेतून राहुल यांना डॉ. अनिल शिंदे यांच्या नंदा मेडिकल फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. संदीप जोशी यांनी उपचार सुरू केले. दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारांसाठी धुळ्यातील सेवा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
नाल्यावर कठडे बसविण्याची मागणी
पिंपळे नाल्यात अपघात होण्याची ही तिसरी घटना असल्याचे नगरसेवक सचिन पाटील यांनी सांगितले. यापूर्वी दुचाकी अपघातात कुमावत नावाचे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तसेच, नाल्याला पूर आलेला असताना एक तरुण वाहून गेल्याची घटनाही घडली होती. सध्या नाल्यात पाणी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र प्रशासनाने धोकादायक भागांवर तातडीने कठडे बसवून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणी सचिन पाटील यांनी केली आहे. राहुल यांच्या अपघातामुळे नाल्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
![]()

