यात्रेतील बंदोबस्तादरम्यान धक्काबुक्की केल्याचे प्रकरण;अमळनेर न्यायालयाकडून आरोपी प्रदीप शिरसाठ यास पाच महिने कारावास व २,००० रुपये दंड…
प्रतिनिधी | अमळनेर : सरकारी कामात अडथळा आणून फिर्यादीस धक्काबुक्की केल्याप्रकरणी आरोपी प्रदीप आनंदा शिरसाठ (वय २९, रा. वालखेडा, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यास न्यायालयाने दोन महिने कारावासाची व १,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मारवड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात (गु.र.नं. १७३/२०२३, सेशन केस नं. ५०/२०२४) हा निकाल देण्यात आला.
जिल्हा न्यायाधीश २ श्रीमती एम. के. एस. कोचर यांच्यासमोर चाललेल्या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण ०५ साक्षीदार तपासले. फिर्यादी, साक्षीदार, पोलीस पाटील, इतर परिस्थितीजन्य पुरावे आणि घटनास्थळी हजर असलेले सहकारी यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस भा. द. वि. कलम ३५३ अन्वये दोन महिने कारावास व १,००० रुपये दंड, तसेच कलम ३३२ अन्वये तीन महिने कारावास व १,००० रुपये दंड ठोठावला. सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील ॲड. के. आर. बागुल यांनी मांडली.
मुडी प्र. डांगरी (ता. अमळनेर) येथील गायमाता मंदिराच्या यात्रेनिमित्त आयोजित लोकनाट्य व यात्रेत फिर्यादी पोहेका ४५४/भरत श्रीराम ईशी हे सहकारी भरत गायकवाड यांच्यासोबत बंदोबस्तासाठी तैनात होते. कर्तव्य बजावत असताना आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण केला, फिर्यादीस धक्काबुक्की व शिवीगाळ केली आणि “तुझा काटा काढतो” अशी धमकी दिली. त्यामुळे आरोपीविरुद्ध भा. द. वि. कलम ३५३, ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या कामकाजात मारवड केसवॉच भरत श्रीराम ईशी, अमळनेर पो. स्टे. केस वॉच व पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्हे, पैरवी अधिकारी पी. एस. आय. उदयसिंग सांळुके (पारोळा पो. स्टे.), पो.कॉ. राहुल रणधीर (चोपडा ग्रामीण पो. स्टे.), पो.हे.कॉ. प्रमोद पाटील (चोपडा शहर पो. स्टे.) आणि जी.पी.एस.आय. दिलीप थोरे (अडावद पो. स्टे.) यांनी सहकार्य केले.
![]()

