श्रीराम कॉम्प्युटराईज्ड क्लिनिकल लॅबला धरणगाव नगरपरिषदेची दंडात्मक नोटीस; सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…
प्रतिनिधी | धरणगाव : शहरातील महावीर चौक परिसरातील श्रीराम कॉम्प्युटराईज्ड क्लिनिकल लॅबोरेटरीमधून रक्त लागलेल्या ट्यूब व अन्य जैव-वैद्यकीय कचरा गटारीत अथवा नालीत टाकल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकाराची दखल घेत धरणगाव नगरपरिषदेने संबंधित प्रयोगशाळेला जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीचा संदर्भ नोटिशीत देण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या नोटिशीनुसार, प्रयोगशाळेत निर्माण होणारा जैव-वैद्यकीय कचरा अधिकृत संस्थेकडे सुपूर्द करून विहित पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना रक्त लागलेल्या ट्यूब, इंजेक्शनसह इतर कचरा गटारीत टाकल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्य तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.
धरणगाव नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनीही या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. गटार साफ करताना रक्त किंवा जैविक पदार्थ लागलेल्या ट्यूब हाताळाव्या लागत असल्याने संसर्ग, दुखापत आणि आरोग्यविषयक धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अशा कचऱ्यामुळे गटार तुंबणे, दुर्गंधी आणि परिसरातील अस्वच्छता वाढण्याची शक्यता असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
नगरपरिषदेने संबंधित प्रयोगशाळेला नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत १० हजार रुपयांचा दंड नगरपरिषदेत जमा करण्याचे, तसेच प्रयोगशाळा व्यवसायाबाबतचे आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र (NOC) दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निर्धारित मुदतीत दंड न भरल्यास व आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.
दरम्यान, जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट नियमांनुसारच लावली जावी आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित कुठलीही प्रकारची तडजोड होऊ नये, अशी मागणी सफाई कामगारांमार्फत करण्यात येत आहे.
![]()

