प्रलंबित महसुली दावे व अपिलांचा परस्पर संमतीने निपटारा; तहसील कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजन…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली महसुली दावे व अपिले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अमळनेर तहसील कार्यालयात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या अभियानात संबंधित पक्षकारांना परस्पर संमतीने प्रकरणांचा कायमस्वरूपी निपटारा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार महसूल प्रशासनातील विविध अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या महसुली दावे व अपिलांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. अमळनेर तालुक्यात यापूर्वी १७ सप्टेंबर २०२६ तसेच पुढील टप्प्यात ६ जानेवारी २०२७ रोजीही अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
लोक अदालतच्या दिवशी दोन्ही पक्षकारांची सहमती झाल्यास संबंधित प्रकरणावर अंतिम आदेश पारित करून ते कायमस्वरूपी निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासोबतच पक्षकारांना जलद न्याय मिळण्यास मदत होणार आहे. महसूल प्रशासनावरील प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
प्रलंबित महसुली दावा किंवा अपील असलेल्या पक्षकारांनी अथवा त्यांच्या वकिलांनी तडजोडीसाठी शासन निर्णयासोबत दिलेल्या ‘प्रपत्र-अ’ मधील नमुन्यानुसार अर्ज संबंधित अर्धन्यायिक न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या संमतीने प्रकरणाचा अंतिम निपटारा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
अमळनेर तालुक्यातील सर्व संबंधित पक्षकारांनी या अभियानाचा अधिकाधिक लाभ घेऊन प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. उभी ढेकळे यांनी केले आहे. या प्रसिद्धीपत्रकाची ग्राम महसूल अधिकारी कार्यालये तसेच ग्रामपंचायत कार्यालयांमध्येही जाहीर प्रसिद्धी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
![]()

