निबंध, वक्तृत्व व सामान्यज्ञान स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा सत्कार…
प्रतिनिधी | अमळनेर : साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये हिंदी दिवसानिमित्त आयोजित हिंदी सप्ताहाचा समारोप विविध उपक्रम व स्पर्धांच्या आयोजनाने करण्यात आला. सप्ताहादरम्यान हिंदी निबंध, वक्तृत्व तसेच सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या. २१ रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविकात अनिता बोरसे यांनी स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक करत, अशा उपक्रमांतून हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यास हातभार लागत असल्याचे सांगितले.
वक्तृत्व स्पर्धेत कल्याणी पाटील (१०वी-अ) हिने प्रथम, दिव्यानी पाटील (१०वी-अ) हिने द्वितीय, तर पूजा पाटील (१०वी-अ) हिने तृतीय क्रमांक मिळविला. अक्षरा साळुंखे (८वी-अ) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. तसेच तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या दृष्टी चौधरी हिचाही अध्यक्ष संदीप घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तिला मुकेश पाटील व आर. एम. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी विद्यार्थिनींनी विविध भाषा शिकून त्यांचे आकलन करून घ्यावे, कारण भाषा अवगत केल्याने ज्ञानात भर पडते, असे सांगितले. हिंदी सप्ताहात संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी विद्यार्थिनी व हिंदी शिक्षकांचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील तसेच संचालक मंडळाने कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. हिंदी शिक्षक दिलीप पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले, तर मुकेश पाटील यांनी आभार मानले.
![]()

