वार्षिक सभेनंतर आमदार अनिल पाटील यांची घोषणा; मोकळ्या जागेवर गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, पेट्रोलपंप उभारण्याची ग्वाही ; भंगार विक्रीचा ठराव जाहीर लिलावाच्या अटीवर मंजूर…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुका शेतकी संघाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी संघाच्या मोकळ्या जागेवर गोडाऊन, कोल्ड स्टोरेज किंवा पेट्रोलपंप यांसारखे उत्पन्नाचे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी दिले. सर्व तांत्रिक अडचणी दूर करून संघाच्या जागेचा उत्पन्ननिर्मितीसाठी प्रभावी वापर करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अमळनेर तालुका शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा २१ सप्टेंबर रोजी जुना टाऊन हॉल येथे संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण नसल्याने सभा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून व्यवस्थापक संजय पाटील यांनी अहवालाचे वाचन केले.
सभेदरम्यान काही सभासदांनी अजेंडा मिळाला नसल्याची तक्रार केली. तसेच शेतकी संघाचे भंगार विक्री करण्याच्या विषयावरही चर्चा झाली. काही सभासदांनी त्यास विरोध दर्शविला; मात्र भंगाराची विक्री पारदर्शक पद्धतीने जाहीर लिलावाद्वारे करण्यात यावी, या अटीवर संबंधित ठराव मंजूर करण्यात आला.
सभेला अध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष गणेश भामरे, संजय पुनाजी पाटील, सचिन पाटील, प्रफुल पवार, विक्रांत पाटील, सुषमा देसले, सुरेश पिरन पाटील, नितीन पाटील, जितेंद्र पाटील, मालुबाई पवार, शंकर बैसाणे व रणजित पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, माजी अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, सुरेश पाटील, जयवंतराव पाटील, संदीप घोरपडे व बन्सीलाल भागवत यांनी चर्चेत सहभाग घेतला.
सभा संपल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी सभासदांशी संवाद साधला. यावेळी सभासदांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासकीय खरेदी केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर संघाच्या मोकळ्या जागेचा वापर करून उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन निर्माण करण्यासाठी गोडाऊन, कोल्ड स्टोरेज किंवा पेट्रोलपंपासारखे प्रकल्प उभारण्याच्या शक्यतांवर काम सुरू असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
![]()

