दोन लहान मुलींना कुत्र्यांचा चावा; चावलेल्या कुत्र्यासह आणखी सहा भटके कुत्रे पकडले, आरोग्य विभाग प्रमुख संतोष जाधव यांनी दिली माहिती…
प्रतिनिधी | अमळनेर : प्रतापनगर–गलवाडे रोड परिसरात दोन लहान मुलींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती मिळताच अमळनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या नियुक्त पथकाने बुधवारी पहाटे ६ वाजता तातडीने कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान मुलीला चावलेल्या कुत्र्यासह परिसरात उपद्रव करणारे आणखी सहा भटके कुत्रे सुरक्षितपणे पकडण्यात आले.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पकडलेल्या कुत्र्यांबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख संतोष जाधव यांच्याकडून सांगण्यात आले. परिसरातील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर नगरपरिषदेने तत्काळ पथक तैनात करून कारवाई केली.
दरम्यान, कुत्रे पकडण्याची कार्यवाही सुरू असताना नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करू नये, कुत्र्यांना त्रास देऊ नये किंवा त्यांना चिथावणी देऊ नये, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारामुळे कुत्रे आक्रमक होऊन नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. कारवाईदरम्यान नगरपरिषदेच्या नियुक्त पथकाला नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन आरोग्य विभाग प्रमुख संतोष जाधव यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्वच्छता विभागामार्फत परिसरात आवश्यक ती कार्यवाही सुरू ठेवण्यात येत आहे.
![]()

