तालुका क्रीडा संकुलात अटीतटीच्या लढती; मुलांसह मुली मल्लांनीही दाखवले दमदार डावपेच व कौशल्य…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर तालुका क्रीडा संकुलातील सुसज्ज हॉलमध्ये शालेय क्रीडा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तालुक्यातील विविध शाळांमधून १२० हून अधिक मुला-मुलींनी स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन केले. दिवसभर रंगलेल्या अटीतटीच्या लढतींमुळे क्रीडा संकुलात कुस्तीचा थरार अनुभवायला मिळाला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अमळनेर तालुका पोलीस विभागाच्या PSI कविता ठाणगे, अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाचे बाळू भाऊ पाटील, माजी नगरसेवक प्रताप आबा शिंपी, संजय पाटील उर्फ भुतं बापू, पैलवान संजय भिला पाटील, तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ आणि महेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, मल्ल्यार्पण व श्रीफळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले.
स्पर्धेदरम्यान मल्लांनी विविध डावपेच, ताकद आणि चपळाईचे दर्शन घडवत प्रेक्षकांची दाद मिळवली. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. प्रितेश तुरणकर, आर. एस. सोनवणे, एच. आर. बाविस्कर, स्वप्निल पाटील, एन. डी. पाटील यांच्यासह विविध व्यायामशाळांचे प्रशिक्षक आणि पंचांचे सहकार्य लाभले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसह सहभागी सर्व मल्लांचे अमळनेर तालुक्यातून कौतुक होत आहे.
![]()

