पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी मिळविले विजेतेपद; अमळनेरातील क्रीडा संकुलात आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
प्रतिनिधी | अमळनेर : कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या वतीने अमळनेर येथील क्रीडा संकुलात आयोजित आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेत बी.पी. आर्ट्स कॉलेज, चाळीसगावच्या पुरुष व महिला संघांनी विजेतेपद पटकावत दुहेरी यश संपादन केले. पुरुष गटात एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी कॉलेज, बांबोरीने तर महिला गटात प्रताप महाविद्यालय, अमळनेरने उपविजेतेपद मिळविले.
या स्पर्धेत पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत प्रत्येकी चार संघांनी सहभाग नोंदविला. विविध सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत उत्स्फूर्त सहभाग घेतला. पुरुष गटातील अंतिम निकालात बी.पी. आर्ट्स कॉलेज, चाळीसगाव संघाने विजेतेपद मिळविले, तर एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी कॉलेज, बांबोरी संघ उपविजेता ठरला. महिला गटातही बी.पी. आर्ट्स कॉलेज, चाळीसगावने विजेतेपद पटकावले असून प्रताप महाविद्यालय, अमळनेर संघाने उपविजेतेपद मिळविले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तथा प्रताप महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीप नेरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले होते. यावेळी प्रा. अमृत अग्रवाल, प्रा. डॉ. शैलेश पाटील, प्रा. डॉ. खुशाल देशमुख, प्रा. मुकुंद शिरसाठ आणि डॉ. सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेतील सामन्यांसाठी जयेश मासरे व सिद्धार्थ पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. अन्य पंचांनीही स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रा. डॉ. देवदत्त पाटील यांनी स्पर्धेचे नियोजन, सहभागी संघांचा समन्वय तसेच खेळाडू व पंचांच्या व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
क्रीडा विभाग, प्राध्यापक, कर्मचारी आणि संबंधितांच्या सहकार्यामुळे स्पर्धेचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.
![]()

