शिरूडमध्ये दोन ठिकाणच्या व्हॉल्व्हमधून गळती; प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा ग्रामस्थांचा आरोप…
प्रतिनिधी | शिरूड (ता. अमळनेर) : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असताना, शिरूड (ता. अमळनेर) गावात मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी गटारीत वाहून जात असल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाजवळच हा प्रकार सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मारोती मंदिरालगत असलेल्या पाणीपुरवठा व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होताना दिसून आली. सकाळच्या सुमारास गावाला पाणीपुरवठा सुरू असताना व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी थेट रस्त्यावरून वाहत गटारीत जात होते. गावाबाहेरील पाण्याच्या टाकीजवळील व्हॉल्व्हमधूनही अशाच प्रकारे गळती सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून अनेक ठिकाणी विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. काही ठिकाणी विहिरी आटल्या असून पाण्याअभावी शेतकऱ्यांची उभी पिके जळाली आहेत. एकीकडे पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे गावातील पिण्याचे पाणी अशा प्रकारे वाया जात असल्याबद्दल ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरच हा प्रकार सुरू असताना संबंधितांच्या नजरेस एवढी गळती पडत नाही का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. दुरुस्ती करून ही गळती थांबविणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
दुष्काळाची तीव्रता वाढण्यापूर्वीच पाणी बचतीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने दोन्ही ठिकाणच्या व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, तसेच गावातील अन्य व्हॉल्व्हचीही तपासणी करून आवश्यक देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. आता तरी ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येऊन पाण्याची नासाडी थांबणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामसेवकांची प्रतिक्रिया
याबाबत शिरूडचे ग्रामसेवक आर. एन. पाटील यांनी सांगितले, “याबाबत मला कल्पना नाही. आजच त्या ठिकाणी हा प्रकार घडला असावा. मी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांशी बोलून तातडीने व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यास सांगतो.”
![]()

