नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिर उत्साहात; शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेतीचे मार्गदर्शन…
प्रतिनिधी | नगाव खुर्द (ता. अमळनेर) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तसेच क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नगाव खुर्द येथे रसायनमुक्त शेती आणि खेत बचाओ अभियानांतर्गत नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे फायदे, रासायनिक शेतीला पर्याय आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हे अभियान इंदासी माता मंदिर परिसरात राबविण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. नैसर्गिक शेतीचे फायदे, रासायनिक शेतीला पर्याय, नैसर्गिक शेतीतून मिळणारे उत्पन्न, तसेच नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांची निर्मिती व उपयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे नैसर्गिक शेती प्रशिक्षक पोपटराव भराटे, बी. एन. पाटील, डॉ. आदित्य माहेश्वरी आणि पवनकुमार वाघ यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. पवनकुमार वाघ यांनी नैसर्गिक शेती, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, तसेच सुदर्शन क्रिया व ध्यानाचे महत्त्व गावागावांत पोहोचविण्यासाठी अशी प्रशिक्षण शिबिरे प्रत्येक गावात आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
शिबिर यशस्वी होण्यासाठी नगाव खुर्दच्या सरपंच सौ. सरला चंद्रकांत जगदाळे आणि नगाव खुर्द व नगाव बुद्रुक येथील कृषी सहाय्यक अधिकारी नवल वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीविषयी जनजागृती होण्यास मदत झाली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पंचायत समिती अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील आणि सुरेश कठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतारा खड्डे तसेच व्ही.बी. रामजी योजनेअंतर्गत विविध विकासकामे राबविली जाणार आहेत. याशिवाय छोट्या बंधाऱ्यांतील गाळ काढण्याची कामे करण्याचा मानसही नगाव खुर्द येथील शेतकरी बंधू-भगिनींनी व्यक्त केला.
नगाव खुर्द येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांचे आभार मानले. यावेळी पुढील शिबिर लवकरात लवकर आयोजित करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली.
![]()

