प्रधानमंत्री, शबरी, रमाई योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा प्रशासनाला निवेदना मार्फत इशारा…
प्रतिनिधी | अमळनेर: अमळनेर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या सोडवून अपूर्ण घरकुले तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेने जिल्हा परिषद जळगावच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे (DRDA) प्रकल्प संचालक यांना आज निवेदन सादर केले.
अमळनेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. निधीअभावी आणि प्रशासकीय अडचणींमुळे अनेक घरकुले अपूर्ण अवस्थेत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनात लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. रखडलेले हप्ते व अनुदान वेळेत उपलब्ध करून द्यावे, पात्र लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, तसेच निधी व तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे संघटनेने म्हटले आहे.
गरीब, गरजू आणि घर नसलेल्या कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ मिळून त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.
निवेदन देताना ईश्वर उखा पाटील, योगराज निंबा कोळी, शरद विनायक पाटील, प्रकाश बोरसे, कृष्णा पाटील, रामदास पाटील, दिलीप मधुकर चौधरी आणि भूषण गोपीचंद कोळी उपस्थित होते. न्याय मिळेपर्यंत आणि त्यांची अपूर्ण घरकुले पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
![]()

