आमदार अनिल पाटील यांचे नागरिकांना आवाहन; वन विभागाची गस्त वाढली, दोन ठिकाणी पिंजरे…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विविध भागांत बिबट्या आढळल्याच्या घटना आणि पाऊलखुणा समोर येत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदगाव शिवारात बिबट्याने हल्ला केल्याची घटना, तसेच अंतुर्ली, ढेकू रस्ता, पिळोदा, धुपी आणि देवळी परिसरात बिबट्याच्या वावराची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने पाहणी व गस्त सुरू केली असून दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.
नंदगाव परिसरातील घटनेनंतर शेतशिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याची माहिती मिळाली आहे. अंतुर्ली परिसरात रात्री डोळे चमकणारा प्राणी दिसल्याची चर्चा असून ढेकू रस्त्यावर बकऱ्या चारणाऱ्या नागरिकांना बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे. पिळोदा, धुपी आणि देवळी शिवारातही बिबट्याचा वावर असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. पपईच्या शेतात बिबट्या लपल्याचे आणि त्यानंतर मक्याच्या शेतात दिसल्याचेही सांगण्यात आले आहे.
घटनांची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने संबंधित भागात पाहणी केली. या परिस्थितीबाबत आमदार अनिल पाटील यांनी वन अधिकारी छत्रपती चव्हाण यांच्याशी संपर्क साधून तालुक्यातील स्थितीचा आढावा घेतला. वन विभागाने गस्त वाढवून अधिक दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी रात्री-अपरात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे, शेतात जाताना दोन-तीन जणांनी एकत्र जावे, सोबत बॅटरी व काठी ठेवावी, तसेच लहान मुलांना एकटे शेतात किंवा घराबाहेर सोडू नये, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी स्वतःबरोबरच पशुधनाचीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तालुक्यात दोन ठिकाणी पिंजरे लावले असून त्यामध्ये सावज म्हणून बकरी ठेवण्यात आली आहे. मात्र रात्री शेतरस्त्यांवरून होणारी वाहनांची वर्दळ आणि त्यांचा आवाज यामुळे बिबट्या पिंजऱ्याजवळ येत नसावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आमदार अनिल पाटील यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. वन विभागाचे पथक गस्त घालत असून बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्यास त्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत. बिबट्या किंवा अन्य संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने वन विभाग अथवा आमदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

