गाय, म्हैस, बैलांसाठी ५० हजार; लहान जनावरांसाठी ५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार..
विशेष बातमी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) च्या विद्युत वाहिनी किंवा उपकरणांमुळे होणाऱ्या प्राणांतिक विद्युत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या जनावरांसाठी देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत कंपनीने भरीव वाढ केली आहे. यासंदर्भात कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक (मासं) भूषण कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने प्रशासकीय परिपत्रक क्र. ७१४ दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, नव्या दरांनुसार गाय, म्हशीसारख्या दुभत्या जनावरांसाठी ५० हजार रुपये तर शेळी, मेंढीसारख्या लहान जनावरांसाठी ५ हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीनुसार निश्चित करण्यात आलेल्या नव्या दरांमध्ये गाय, म्हैस यांसारखी दुभती जनावरे तसेच गाढव, बैल, घोडा आदी जनावरांचा प्राणांतिक विद्युत अपघातात मृत्यू झाल्यास ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर शेळी, मेंढी, वासरू यांसारख्या जनावरांसाठी ५ हजार रुपये भरपाई अदा केली जाणार आहे.
यापूर्वी सन २००८ मध्ये जारी करण्यात आलेल्या परिपत्रक क्र. १९२ अन्वये कंपनीबाह्य व्यक्ती तसेच जनावरांना होणाऱ्या विद्युत अपघातांबाबत नुकसान भरपाईसंदर्भात सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सन २०११ मध्ये संचालक (संचालन) यांच्या परिपत्रकान्वये प्राणांतिक विद्युत अपघातांबाबतचे प्रस्ताव तयार करताना अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. जनावरांना होणाऱ्या अपघातांमुळे द्यावयाच्या भरपाई रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव कंपनीच्या विचाराधीन होता, त्यास आता मंजुरी मिळाली आहे.
नुकसान भरपाई देण्याची कार्यपद्धती व सन २०११ च्या परिपत्रकातील इतर तरतुदी मात्र कायम ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती कंपनीने दिली. हे नवे दर परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होणार असून, हे परिपत्रक महावितरण कंपनीच्या ई-लायब्ररीवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही सूचना कंपनीच्या प्रेषण यादीनुसार सर्व संबंधित कार्यालयांना पाठवण्यात आली आहे.
![]()

