बसफेऱ्या रद्द, विलंबामुळे विद्यार्थी त्रस्त; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन, आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे मुळगाव असलेल्या हिंगोणे येथेच एसटी बससेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करत NSUIने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नियमित बसफेऱ्या उपलब्ध न होणे, बसला विलंब होणे आणि अचानक फेऱ्या रद्द होणे यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे सांगत NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन बससेवा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली.
हिंगोणे येथील विद्यार्थ्यांना मागील अनेक महिन्यांपासून नियोजित वेळेनुसार एसटी बस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही वेळा बस दोन-दोन तास उशिराने सुटते, तर काही फेऱ्या अचानक रद्द होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेवर पोहोचणे कठीण होत आहे. परिणामी लेक्चर, प्रॅक्टिकल, परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेले शैक्षणिक तास बुडत असल्याचे विद्यार्थ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
विशेषतः सकाळच्या वेळेत नियमित बस उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दररोजचा अतिरिक्त प्रवासखर्च पालकांवर आर्थिक भार ठरत आहे. काही विद्यार्थ्यांना बसच्या प्रतीक्षेत तासन्तास बसस्थानकावर थांबावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
बससेवेच्या अनियमिततेचा फटका केवळ विद्यार्थ्यांनाच बसत नसून गावातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. रुग्णांना उपचारासाठी अमळनेरला जाणे, महिलांना दैनंदिन कामांसाठी प्रवास करणे, तर ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालये व आरोग्यसेवांसाठी शहरात पोहोचणे अडचणीचे होत आहे. अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांची वेळेवर वाहतूक न मिळाल्याने होणारी गैरसोय गंभीर असल्याचे NSUIने म्हटले आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एसटी बस ही केवळ सार्वजनिक वाहतुकीचे साधन नसून शिक्षणाशी जोडलेली महत्त्वाची सुविधा आहे. त्यामुळे हिंगोणे गावासाठी पुरेशा बसफेऱ्या सुरू कराव्यात, बंद असलेल्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात, निर्धारित वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे आणि शाळा-महाविद्यालयांच्या वेळेनुसार विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी NSUIने केली.
यावेळी ॲड. कौस्तुभ पाटील यांनी आगार प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली. या कालावधीत हिंगोणे येथील बससेवेचा प्रश्न मार्गी लावून विद्यार्थ्यांना व नागरिकांना नियमित आणि वेळेवर वाहतूक सुविधा उपलब्ध करून न दिल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन NSUIच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी NSUI अमळनेर तालुकाध्यक्ष उमेश संदानशिव, जयेश संभाजी पाटील, कुणाल कोळी, तेजस भोई, मयंक चव्हाण, रोहित कोळी, महेश कोळी, यश पाटील, महेश भोई, प्रवीण पाटील यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
![]()

