जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे शासकीय कार्यालयांना आदेश; अभ्यागतांसाठी कार्यालयाबाहेर स्वतंत्र फलक लावण्याच्या सूचना…
प्रतिनिधी | अमळनेर : शासकीय कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची भेट सुलभ व्हावी, यासाठी दुपारी ३ ते ५ ही अभ्यागत भेटीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. महसूल मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना याबाबत आदेश दिले आहेत.
या निर्णयानुसार संबंधित शासकीय कार्यालयांच्या बाहेर ‘अभ्यागत भेटीची वेळ : दुपारी ३ ते ५’ असा स्पष्ट फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकारी भेटण्यासाठी निश्चित वेळेची माहिती उपलब्ध होणार असून, कार्यालयीन कामकाजात अधिक शिस्त आणि नागरिकाभिमुखता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महसूल मंत्र्यांनी ४ सप्टेंबर रोजी घेतलेल्या दूरचित्रवाणी बैठकीत शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिक व अभ्यागतांना अधिकाऱ्यांची भेट घेणे सुलभ व्हावे, यासाठी प्रत्येक कार्यालयाबाहेर अभ्यागत भेटीची निश्चित वेळ दर्शविणारा फलक लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हास्तरावर या निर्देशांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी घुगे यांनी अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखाप्रमुख, उपविभागीय अधिकारी, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना त्यांच्या कार्यालयाबाहेर अभ्यागत भेटीची वेळ दर्शविणारे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या आदेशाची अमळनेरमध्ये तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असून, उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांच्या कार्यालयाबाहेर दुपारी ३ ते ५ ही अभ्यागत भेटीची वेळ दर्शविणारा फलक लावण्यात आला आहे.
निश्चित भेटीची वेळ उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना अधिकारी भेटण्यासाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच अधिकारी व नागरिक यांच्यातील संवादासाठी निश्चित वेळ उपलब्ध झाल्याने शासकीय कामकाज अधिक सुसूत्र आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होऊ शकते.
![]()

