शिरसाळे येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते; ९५ विद्यार्थ्यांनी सादर केली वैज्ञानिक उपकरणे…
प्रतिनिधी | अमळनेर : पंचायत समिती अमळनेर व बी. वाय. चौधरी माध्यमिक विद्यालय, शिरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सानेगुरुजी विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. शिरसाळे येथे आयोजित या प्रदर्शनात सुमारे ९५ विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणे व प्रतिकृती सादर करून आपल्या संशोधनवृत्तीचे दर्शन घडवले.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते रिमोटच्या साहाय्याने रॉकेट लॉन्चर कार्यान्वित करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय शिरोडे होते, तर माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना मिळते, तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची प्रेरणा मिळते, असे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी पाण्याची काटकसर करण्याचे आणि उपलब्ध जलस्रोतांचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. दुष्काळाच्या संकटाला सामूहिक प्रयत्नांतून सामोरे जाण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांनी शिरसाळे येथील शाळेच्या भौतिक प्रगतीचे कौतुक केले.
प्रदर्शनातील लहान विद्यार्थी गटात सानेगुरुजी प्राथमिक विद्यामंदिरच्या योगांक्षी संजीव पाटील हिने प्रथम, डी. आर. कन्याशाळेच्या निधी जगदीश पाटील हिने द्वितीय, तर एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या अधिराज सुमित सूर्यवंशी याने तृतीय क्रमांक मिळवला. देवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रीती किशोर महाजन हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
मोठ्या विद्यार्थी गटात सानेगुरुजी कन्या विद्यालयाच्या गायत्री धनराज बोरसे हिने प्रथम, एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूलच्या प्राक्तन प्रफुल्ल पाटील याने द्वितीय, तर यशवंत आश्रमशाळा, पिंपळे येथील तमन्ना चंपालाल पावरा हिने तृतीय क्रमांक पटकावला. बी. वाय. चौधरी हायस्कूल, शिरसाळे येथील कुंजन श्रीकांत चव्हाण याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
प्राथमिक शिक्षक गटात जिल्हा परिषद केंद्रशाळा, शहापूर येथील पूनम जगतराव साळुंखे यांनी प्रथम, जिल्हा परिषद शाळा, तांदळी येथील सुधीर शांताराम चौधरी यांनी द्वितीय, तर सानेगुरुजी प्राथमिक विद्यामंदिरचे उमेश अमृत पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला. माध्यमिक शिक्षक गटात माध्यमिक विद्यालय, नगाव गडखांब येथील आकाश सुरेश पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे अनिल नथु पाटील आणि एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूलचे रितीक शिखर जैन यांनाही पारितोषिके मिळाली.
बक्षीस वितरण समारंभास उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पाटील, संस्थाध्यक्ष संजय शिरोडे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर, कार्याध्यक्ष संजय पाटील आणि उमेश काटे उपस्थित होते.
परीक्षक म्हणून जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे, डॉ. पी. एस. कोळी, अविनाश मोरे, चंद्रशेखर पाटील आणि सचिन ठाकूर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी केले. सुरुवातीला विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले, तसेच गीताच्या माध्यमातून मानवी उत्क्रांतीचा प्रवास उलगडून दाखवला. विजय पवार आणि संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक प्रवीण पवार यांनी आभार मानले.
![]()

