नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; माजी आमदार शिरीष चौधरी यांचे प्रतिपादन…
प्रतिनिधी | अमळनेर : प्रभाग क्रमांक ८ मध्ये नागरिकांसाठी विविध अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या तब्बल एक कोटी रुपये खर्चाच्या ‘तिरुपती बालाजी नमो गार्डन’चे भूमिपूजन करण्यात आले. लहान मुले, तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी या उद्यानात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी केले.
भूमिपूजनप्रसंगी बोलताना शिरीष चौधरी म्हणाले की, चांगल्या कामांना वेळ लागतो. विरोधकांकडून टीका करण्यात आली; मात्र संयमाने काम करत पाणीपुरवठाही तीन दिवसाआड नियमित सुरू करण्यात आला. विकासकामांची सुरुवात प्रभाग क्रमांक ८ मधील या उद्यानाच्या माध्यमातून होत असून, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तिरुपती बालाजी नमो गार्डनमध्ये योगा हॉल, सुरक्षारक्षकांसाठी खोली, ज्येष्ठ नागरिकांसाठी शेड व बाक, ओपन जिम, कार्यक्रमांसाठी स्टेज, फिरण्यासाठी पाथवे, विद्युत प्रकाश व्यवस्था तसेच मुलांसाठी खेळणी अशा विविध सुविधा प्रस्तावित आहेत. उद्यानाच्या मध्यभागी तिरुपती बालाजीचा पुतळाही उभारण्यात येणार आहे.

यावेळी चौधरी यांनी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या फरकाने अपूर्वा चौधरी आणि नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांना निवडून दिल्याचा उल्लेख केला. नागरिकांनी दाखविलेला विश्वास कायम राखण्याची जबाबदारी असून, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. उद्यानाच्या गरजेवरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असले तरी, विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर दिले जाईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी तिरुपती बालाजीचा उल्लेख ‘सोन्याचा देव’ असा करत, त्याच्या नावाने उभारण्यात येणारे हे उद्यान म्हणजे सोन्यासारख्या विकासाचे प्रतीक असल्याचे सांगितले. घरातील काम करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, इतर नागरिक तसेच मुलांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक वातावरण आणि खेळती हवा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या उद्यानासाठी मिळणाऱ्या पाच कोटी रुपयांच्या बक्षिसाचेही उद्दिष्ट साध्य करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि पी. डी. साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार नगरसेविका अपूर्वा चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमास माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, बांधकाम सभापती साहेबराव पवार, शिक्षण सभापती नावेद शेख, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील, शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील, गटनेते पंकज चौधरी, अपक्ष गटनेते महेश देशमुख यांच्यासह अनिल महाजन, श्रीराम चौधरी, मोहन सातपुते, प्रा. भरतसिंग परदेशी, दीपक चौगुले, बाळासाहेब संदांनशीव, सुरज परदेशी, मुन्ना शर्मा, पंकज भोई, मंगलाताई देसले, शहरप्रमुख भरत पवार, विलास कंखरे आणि युवासेनेचे राहुल कंजर उपस्थित होते.
![]()


