पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत, अमळनेर-पारोळ्यात सर्वेक्षण व पंचनाम्यांची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ द्यावा, अशी आग्रही मागणी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बँका, पतसंस्था तसेच विविध वित्तीय संस्थांकडून पीक कर्ज घेत शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जाचा वाढता भार आणि उत्पादनाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
या गंभीर परिस्थितीची तातडीने शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शासनातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन देऊन अमळनेर व पारोळा तालुक्यांतील सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.
अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करावेत, तसेच दोन्ही तालुक्यांना कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत, आवश्यक त्या शासकीय सवलती, पीक नुकसानभरपाई तसेच इतर योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
“शेतकरी अडचणीत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आपली प्राथमिकता आहे,” या भावनेतून आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा आणि शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
![]()

