गलवाडे, पिंपळे, ढेकू, मारवड रोडसह ८० फूट रस्ता मोकळा करण्याची ‘आप’ची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील प्रमुख रहदारीच्या रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झाडे व झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः गलवाडे रोड, पिंपळे रोड, ढेकू रोड, मारवड रोड तसेच नवनिर्मित ८० फूट रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे तातडीने हटवून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या (आप) अमळनेर तालुका अध्यक्ष महेंद्र नाना साळुंखे आणि तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण देवरे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रस्त्यांच्या वळणांवर वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्यांमुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना दुखापत होण्याचा धोका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नवनिर्मित ८० फूट रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडे-झुडपांमुळे नव्या रस्त्याच्या देखभालीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. डांबरीकरण व सिमेंटच्या रस्त्याच्या कडेला वाढणाऱ्या झाडाझुडपांमुळे रस्त्याची दुरवस्था होऊन त्याचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे ‘आप’ने निदर्शनास आणून दिले आहे. या मार्गांवर दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक व वाहनांची ये-जा होत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील संबंधित रस्त्यांची पाहणी करून काटेरी झाडे व झुडपे तातडीने हटवावीत, अशी मागणी ‘आप’चे तालुका अध्यक्ष महेंद्र नाना साळुंखे आणि तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण देवरे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन अमळनेर नगरपरिषद कार्यालयात सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
![]()

