शिक्षकांच्या भूमिका साकारत विद्यार्थिनींनी केले प्रत्यक्ष अध्यापन; अनुभव केले मनोगतातून व्यक्त…
प्रतिनिधी | अमळनेर : खा. शि. मं. संचलित श्रीमती डि. आर. कन्या शाळेत ५ सप्टेंबर रोजी भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या भूमिका स्वीकारत दिवसभर प्रत्यक्ष अध्यापनाचे काम केले. हा उपक्रम ‘स्वयंशासन दिन’ म्हणून राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर तसेच विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळ व दुपार अशा दोन्ही विभागांत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी व उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे होते.
स्वयंशासन दिनांतर्गत दुपार विभागाच्या मुख्याध्यापिकेची भूमिका यशस्वी शिंगारे, तर सकाळ विभागाच्या मुख्याध्यापिकेची भूमिका जान्हवी साळुंखे यांनी निभावली. तसेच रोशनी पाटील, अश्मीरा शेख, अर्पिता अहिरराव, प्रांजल पवार, खुशी पाटील, माहेश्वरी न्याहाळे व प्रांजल पाटील या विद्यार्थिनींनी शिक्षक व शिक्षिकांच्या भूमिका स्वीकारून विद्यार्थ्यांना अध्यापन केले. प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करताना शिक्षकांची जबाबदारी आणि त्यातील अनुभव विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष अनुभवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधींनी केले. सकाळ विभागात आरोही गोसावी, तर दुपार विभागात निकिता पाटील यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. यावेळी पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एस. माळी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका श्रीमती आर. एस. सोनवणे, विद्यार्थी संघाच्या श्रीमती प्रतिभा साबे, श्रीमती एस. एस. देवरे व श्री. शाम पवार यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक व शिक्षक म्हणून केलेल्या कार्याची माहिती देत त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील स्थान आणि समाज घडविण्यातील भूमिका याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थिनींनी दिवसभर शिक्षकाची भूमिका पार पाडताना आलेले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. अध्यापन करताना शिक्षकांची जबाबदारी, संयम आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचे कौशल्य याची जाणीव झाल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. सहभागी विद्यार्थिनींचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
![]()

