मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; कलम 21 मधील ‘लोकसेवक’च्या व्याख्येचा घेतला आधार…
विशेष बातमी | नागपूर : बँक कर्मचाऱ्यावर हल्ला केला किंवा त्याच्या कामात अडथळा आणला म्हणून आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या (भादंवि) कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. भादंवि कलम 353 लागू करण्यासाठी संबंधित व्यक्ती कायद्यानुसार ‘लोकसेवक’ असणे ही प्राथमिक आणि अनिवार्य अट असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती मेहरोज खान पठाण यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा निर्वाळा दिला. भादंवि कलम 21 मध्ये ‘लोकसेवक’ या संज्ञेची व्याख्या करण्यात आली आहे. या व्याख्येचा विचार करता सर्वसाधारणपणे बँक कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
शासकीय कामात अडथळा आणणे किंवा लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा बळाचा वापर करणे, यासाठी भादंवि कलम 353 लागू केले जाते. मात्र, या कलमाचा वापर करण्यापूर्वी ज्या व्यक्तीच्या कामात अडथळा आणला गेला आहे, ती व्यक्ती कलम 21 नुसार लोकसेवकाच्या व्याख्येत येते का, हे तपासणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने अधोरेखित केले.
न्यायालयाने बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम 46-अचाही संदर्भ घेतला. या तरतुदीनुसार बँक कर्मचाऱ्यांना विशिष्ट प्रकारच्या, विशेषतः भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्ह्यांच्या संदर्भात ‘लोकसेवक’ मानण्याची तरतूद आहे. मात्र, त्यामुळे बँकेतील प्रत्येक कर्मचारी सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींमध्ये भादंवि कलम 21 अंतर्गत लोकसेवक ठरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आपल्या निष्कर्षासाठी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या काही निर्णयांचाही दाखला दिला. बँक कर्मचारी हा केवळ विशिष्ट कायदेशीर तरतुदींमुळे लोकसेवक मानला जाऊ शकतो; मात्र त्यामुळे भारतीय दंड विधानातील कलम 21 च्या सर्वसाधारण व्याख्येत त्याचा समावेश आपोआप होत नाही, अशी भूमिका न्यायालयाने स्पष्ट केली.
या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन, मारहाण किंवा त्यांच्या कामात अडथळा आणण्याच्या प्रत्येक घटनेत सरसकट भादंवि कलम 353 लावता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित व्यक्ती ‘लोकसेवक’च्या कायदेशीर व्याख्येत येते का, तसेच घटनेला इतर कोणत्या फौजदारी कायद्याच्या तरतुदी लागू होतात, याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागणार आहे.
![]()

