नगरपरिषदेचा इशारा : नियमितीकरणासाठी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहर व शहर हद्दीबाहेरील परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत नळकनेक्शनविरोधात अमळनेर नगरपरिषदेने शोधमोहीम हाती घेतली आहे. अनधिकृत नळजोडणीद्वारे पाण्याचा वापर करणाऱ्या नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून आपल्या नळकनेक्शनचे नियमितीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.
नगरपरिषदेने जाहीर केलेल्या प्रसिद्धीनुसार, शहरात अनेक ठिकाणी अधिकृत परवानगीशिवाय नळकनेक्शन घेऊन पाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अनधिकृत जोडण्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
अनधिकृत नळकनेक्शन असलेल्या नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून अनधिकृत नळकनेक्शनद्वारे वापरलेल्या पाण्याचे नाममात्र आकारणी करून आपले नळकनेक्शन नियमित करून घ्यावे, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१ ऑक्टोबर २०२६ पासून नगरपरिषदेच्या शोधमोहीमेदरम्यान अनधिकृत नळजोडणी आढळल्यास संबंधित नागरिकाकडून प्रत्येक नळकनेक्शनसाठी १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नगरपरिषदेच्या म्हणण्यानुसार, शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी अनधिकृत जोडण्यांवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी कारवाईची प्रतीक्षा न करता स्वेच्छेने नळकनेक्शन नियमित करून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

