गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी सूचना…
प्रतिनिधी | अमळनेर : राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्डची सक्ती करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करत NCMC कार्ड नसलेल्या पात्र महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही ५० टक्के प्रवास सवलत मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
राज्य सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासाच्या भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. तसेच ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ दिला जातो. मात्र, या सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती करण्यात आल्याने अनेक प्रवाशांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या.
गणेशोत्सवाच्या काळात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांची मोठ्या प्रमाणावर एसटीने प्रवासाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत NCMC कार्ड नसल्यामुळे पात्र प्रवाशांना पूर्ण तिकीट आकारले जाण्याची किंवा सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन एसटी प्रशासनाकडून तात्पुरती दिलासादायक भूमिका घेण्यात आली आहे.
माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली. शासन निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी बसमधून प्रवास करताना NCMC कार्डची सक्ती करण्यात आली होती. मात्र, कार्ड नसल्यामुळे प्रवाशांना पूर्ण तिकीट आकारले जाण्याची बाब लक्षात घेऊन सवलतीबाबत स्पष्टता करण्यात आली आहे.
NCMC कार्ड नसल्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांनी गैरसोय करून घेऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून NCMC कार्डची सक्ती तात्पुरती करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे सणासुदीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, NCMC कार्ड नसले तरी ५० टक्के प्रवास सवलतीचा लाभ मिळणार असल्याने प्रवाशांचा संभ्रम दूर झाला आहे.
![]()

