शाळा सुटल्यानंतर पोहण्यासाठी गेला; पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना…
अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील कन्हेरे येथे बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दक्ष राजेंद्र नेरकर असे मृत बालकाचे नाव आहे.
दक्ष हा शाळा सुटल्यानंतर बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. नदीपात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने नदीपात्राकडे धाव घेतली. नागरिकांनी दक्षचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
दक्षला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे कन्हेरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नेरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

