संवेदनशील भागांत पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; ११ अधिकारी, १२५ अंमलदारांसह दंगा नियंत्रण व QRT पथकाचा सहभाग…
अमळनेर | प्रतिनिधी : आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने सोमवारी (दि. २४) सकाळी शहरातील संवेदनशील भागांत रूट मार्च काढला. सकाळी १० ते ११.२० या वेळेत झालेल्या या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी-अंमलदार, दंगा नियंत्रण पथक, QRT पथक तसेच पोलीस बँड पथक सहभागी झाले होते.
जळगावचे पोलीस अधीक्षक मा.श्री.श्रीकांत धिवरे सो, मा.श्री.अशोक नखाते सो. अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परिमंडळ, मा.श्री. विनायक कोते सो., उपविभागीय पोलीस अमळनेर भाग, अमळनेर यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च पार पडला. आगामी सणाच्या अनुषंगाने शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांची उपस्थिती अधोरेखित करत नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
रूट मार्चची सुरुवात शहरातील प्रमुख संवेदनशील भागांतून करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली डीपी, आखाडा मकान, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक आणि गांधलीपुरा चौकी आदी भागांतून पोलिसांनी संचलन केले.
सणाच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आला.
रूट मार्चमध्ये अमळनेर पोलीस ठाण्याचे सहा अधिकारी व ४८ अंमलदार सहभागी झाले. त्याचबरोबर मारवड पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी व १५ अंमलदार, एरंडोल पोलीस ठाण्याचा एक अधिकारी व १० अंमलदार आणि धरणगाव पोलीस ठाण्याचा एक अधिकारी व तीन अंमलदार सहभागी झाले.
तसेच चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे तीन अंमलदार, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे तीन अंमलदार, पोलीस मुख्यालयाचे तीन दंगा नियंत्रण पथक आणि एक QRT पथक रूट मार्चमध्ये सहभागी झाले. एकूण ११ अधिकारी आणि १२५ अंमलदारांचा या संचलनात सहभाग होता.
रूट मार्चदरम्यान जळगाव पोलीस मुख्यालयाचे बँड पथकदेखील उपस्थित होते. मोठ्या पोलीस बंदोबस्तासह शहरातील प्रमुख व संवेदनशील भागांतून झालेल्या या संचलनामुळे आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिस प्रशासनाची सज्जता स्पष्ट झाली.
सणासुदीच्या काळात नागरिकांनी शांतता व सलोखा कायम ठेवत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

