‘एआय पी एच एच ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड’कडून प्रेम पाटील यांना ३० हजारांची मदत; सदस्य नसतानाही सहकाऱ्याच्या संकटात धावून आले फोटोग्राफर बांधव…
प्रतिनिधी|अमळनेर : दि. ३१ जुलै रोजी अमळनेर शहराला आलेल्या महापुरात गळवाडे रोडवरील मुंदडा रेसिडेन्सीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील फोटोग्राफर प्रेम पाटील यांच्या स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. स्टुडिओमध्ये पाणी शिरल्याने फोटोग्राफी व्यवसायाशी संबंधित साहित्य व इतर साधनांचे नुकसान झाले. या नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केले. हे दृश्य पाहून फोटोग्राफर बांधवांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
‘ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड फाऊंडेशन’चे महाराष्ट्र सचिव पवन बन्सल यांनी सोशल मीडियावर प्रसारित झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेम पाटील यांच्याशी संपर्क साधत नुकसानीची माहिती घेतली. प्रेम पाटील हे संस्थेचे सदस्य नसतानाही केवळ ‘फोटोग्राफर बांधव’ या भावनेतून ‘एआय पी एच एच ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँडने त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
त्यानुसार संस्थापक व अध्यक्ष धरम सरोज, उपाध्यक्ष अशोक कोटियन, महाराष्ट्र खजिनदार नितीन पाटील, महाराष्ट्र सचिव पवन बन्सल आणि दिलीप सोनार यांनी सहकाऱ्यांसह दि. ९ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे येऊन प्रेम पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांना ३० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.
यावेळी संस्थापक व अध्यक्ष धरम सरोज यांनी उपस्थित फोटोग्राफर बांधवांना मार्गदर्शन केले. फोटोग्राफरच्या स्टुडिओमध्ये महत्त्वाची उपकरणे तसेच ग्राहकांचा डेटा असतो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात उपकरणे आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटोग्राफी व्यवसायातील स्पर्धेपेक्षा परस्पर सहकार्याची भावना अधिक महत्त्वाची असल्याचेही सरोज यांनी स्पष्ट केले. सहकाऱ्याला प्रतिस्पर्धी न मानता मित्र समजून त्याच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून गेल्यास व्यवसायाचीही प्रगती होऊ शकते. ‘संकटात मदत हीच खरी एकजूट’ असल्याचा संदेश त्यांनी दिला.
अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी असोसिएशनच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवांसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. फोटोग्राफर बांधवांच्या अडचणी सोडविण्यासह गरजेच्या वेळी परस्पर सहकार्य करण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष भगवान पाटील, खजिनदार मनोज चित्ते, अनंत पाटील, नितीन भावसार, गौरव शुक्ल, वरुण पाटील, प्रणव महाजन, राहुल भोई, विपुल पाटील, कुणाल पाटील यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.
महापुरामुळे नुकसान झालेल्या सहकाऱ्याच्या मदतीला फोटोग्राफर बांधवांनी एकत्रितपणे धावून येत व्यावसायिक क्षेत्रातील परस्पर सहकार्याचे उदाहरण घडविले. संकटाच्या काळात संघटितपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हाच खऱ्या अर्थाने एकजुटीचा संदेश असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.
![]()

