“हा माझा नव्हे, तर मतदारसंघातील नागरिकांचा गौरव”; पुरस्कारावर प्रतिक्रिया देताना खासदार वाघ भावूक…
विशेष बातमी | जळगाव : संसदेतील उत्कृष्ट कामगिरी आणि लोकहिताच्या प्रश्नांची सातत्यपूर्ण मांडणी केल्याबद्दल जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर झाला असून तो त्यांना प्रदान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, खासदार वाघ यांनी सलग दुसऱ्या वर्षी या मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरून जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

संसद रत्न पुरस्कारासाठी खासदारांच्या संसदीय कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यमापन केले जाते. प्रश्न विचारणे, चर्चांमध्ये सहभाग, सभागृहातील उपस्थिती आणि संसदीय कामकाजातील एकूण योगदान यांचा त्यात विचार केला जातो. २०२६ मधील निवड ही बजेट अधिवेशन २०२६ पर्यंतच्या संसदीय कामगिरीच्या आधारे करण्यात आली.
खासदार वाघ यांच्या मतदारसंघाशी संबंधित विविध प्रश्नांची संसदेत मांडणी तसेच विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्याची या पार्श्वभूमीवर संसद रत्न समिती आणि ज्युरी सदस्यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. दिल्लीत पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना या सन्मानाने भूषवण्यात आले.

हा सन्मान माझ्या मतदारसंघातील जनतेचा: खा. स्मिता वाघ
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार वाघ यांनी हा गौरव जळगावच्या जनतेला समर्पित केला. “हा वैयक्तिक सत्कार नसून माझ्या मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेल्या अढळ विश्वासाची आणि आशीर्वादाची पावती आहे. पहिल्या पुरस्काराने कामाचा हुरूप वाढवला होता, तर या दुसऱ्या सन्मानामुळे जनतेप्रती असणारी माझी उत्तरदायित्वाची भावना आणि जबाबदारी अधिक पटीने वाढली आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आपल्या यशाचे श्रेय वरिष्ठ नेतृत्वाला देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याशिवाय पुरस्कार समिती, संसदीय सहकारी, पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यंदा महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न
२०२६ मध्ये महाराष्ट्रातून पाच खासदारांना संसद रत्न पुरस्कार मिळाला. त्यामध्ये जळगावच्या खासदार स्मिता उदय वाघ यांच्यासह डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, नरेश गणपत म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा आणि राज्यसभा खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांचा समावेश आहे.
![]()

