छोटा हत्ती वाहन पलटी होऊन तीन ते चार जण जखमी; धुळ्यात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास…
अमळनेर | प्रतिनिधी : तालुक्यातील सारबेटे खुर्द फाट्याजवळ छोटा हत्ती वाहनाचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सारबेटे बुद्रुक येथील गोलू पठाण (वय २१) या विवाहित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता हा अपघात झाला. धुळे येथे उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोलू पठाण हा अमळनेरहून आपल्या घरी परतत होता. मोईन ठेकेदार यांच्या छोटा हत्ती वाहनाचा सारबेटे खुर्द फाट्याजवळ अचानक टायर फुटल्याने वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. या घटनेत गोलूसह तीन ते चार जण जखमी झाले.
अपघातानंतर गोलू याला तातडीने अमळनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.
गोलू पठाण यांच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ व त्याची पत्नी, मयत गोलू ची पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. अवघ्या २१व्या वर्षी झालेल्या या अकाली निधनामुळे पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सारबेटे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

