मिलन म्हात्रे यांना राजकीय, तर उज्वलकुमार चव्हाण यांना सामाजिक (पुरोगामी) पुरस्कार; राज्यभरातील वक्तृत्व स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद…
अमळनेर | प्रतिनिधी : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात यंदाचे राज्यस्तरीय राजकीय पुरस्कार जनता दलाचे नेते तथा मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे, तर सामाजिक (पुरोगामी) पुरस्कार माजी आयआरएस अधिकारी व जलसंवर्धन तज्ज्ञ उज्वलकुमार चव्हाण यांना प्रदान करण्यात आले. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ ऑगस्ट रोजी या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. लाल टोपी, बागायतदार रुमाल, २१ हजार रुपये रोख आणि ‘शिंगाडेधारी गुलाबराव पाटील’ स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारलिंगी समाजाच्या अभ्यासक शमिभा पाटील होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सोशल मीडियावरील प्रत्येक संदेशावर विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले. संदर्भग्रंथांचा अभ्यास आणि वाचनातून विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक भक्कम होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
लोकशाहीच्या संवर्धनात नव्या पिढीची भूमिका महत्त्वाची असून, द्वेषाऐवजी संवाद, अफवांऐवजी सत्याची पडताळणी, व्यक्तीपूजेऐवजी विचार आणि विभाजनाऐवजी बंधुत्व यांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. संविधानाच्या प्रास्ताविकेतील मूल्ये आचरणात आणल्यास संविधानाला अभिप्रेत समाजनिर्मिती शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्कारमूर्ती उज्वलकुमार चव्हाण यांनी आपल्या मनोगतात जलसंवर्धनाच्या कार्याचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान देणारी माणसे घडवली, हे त्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील २३८ गावांमध्ये जलक्रांती घडवून आणल्याचे नमूद केले.
गावागावांत पाण्याच्या प्रश्नासाठी पुढाकार घेणारी माणसे तयार करणे हीच आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाची सवय लावावी, जीवनमूल्यांसाठी वारकरी संप्रदायातील हरिपाठ ऐकावा, तसेच शाळांनी विपश्यना केंद्र सुरू करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
दुसरे सत्कारमूर्ती मिलन म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा गौरव करत त्यांनी स्मृती समारोहाच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी केले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बाविस्कर, डॉ. शकील जलालोद्दीन शेख, भास्कर बोरसे, किरण पाटील, मगन पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, अनिता पाटील, सुनील पाटील यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोहानिमित्त आयोजित ‘साथी संदेश’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संभाजीनगर येथील प्रशांत चिंतामण बेले याने प्रथम क्रमांक पटकावला. मालेगाव येथील समृद्धी संजय मोरणकार हिने द्वितीय, तर जळगाव येथील रुपेश जयंत पाटील याने तृतीय क्रमांक मिळवला. अमळनेरच्या कल्याणी संदीप पाटील हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
राज्यभरातून विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. साहित्य व नाट्य क्षेत्रातील प्रा. राजेंद्र देशमुख, कविवर्य बी. एन. चौधरी व संजय नेरकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर, जे. एस. पाटील, मोनिका पाटील व शारदा उंबरकर यांनी केले, तर मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी आभार मानले.

