शनिवार पासून शहरातील वेगवेगळ्या प्रभागात पाणीपुरवठा करण्यात येणार..
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहराला पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी ही ३१ जुलैच्या, महापुरात वाहून गेलेली होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा हा विस्कळीत झालेला होता. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. विविध ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तर काही नागरिक स्वतःहून पुढाकार घेऊन अन्य नागरिकांना पाणी वाटप करीत होते.

याच पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेने संबंधित जलवाहिनीचे काम युद्धपातळी वर सुरू केलेले होते. मध्यंतरी काळात पाण्याच्या तीव्र दबावामुळे संबंधित जलवाहिनी पुन्हा फुटल्याचे चित्र समोरे आलेले होते.
अमळनेर नगरपरिषदे मार्फत हे काम करण्यासाठी एक स्वतंत्र निविदा काढण्यात आलेली होती. मात्र निविदा पूर्ण करण्यात खर्च होणारा अनावश्यक वेळ वाया न होऊ देता, त्या अगोदरच नगरपरिषदेच्या सूचनेवर काम करून संबंधित जलवाहिनीचे काम हे पूर्ण करण्यात आलेले आहे.

सदरहू काम हे आता अंतिम टप्प्यात आलेले असून, लवकरच शहरातील पाणीपुरवठा हा पूर्ववत होण्याचे चिन्ह दिसत आहे. प्रशासनामार्फत काम पूर्ण झाल्यावर त्याची तपासणी होऊन, शहरातील विविध प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी त्याठिकाणी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, संबंधित सर्व नगरसेवक आणि संबंधित सर्व लोक यांचे नागरीकांमार्फत कौतुक करण्यात येत आहे.

